सर्वसामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणारे भाजप सरकार हद्दपार करा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशातील सर्वसामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणारे आणि सामान्य माणसांच्या अडचणी दूर करण्याऐवजी सर्वांनाच अडचणीत आणणारे भाजप सरकार हद्दपार करा असे आवाहन भाकपचे राज्यसह सेक्रेटरी ॲड.कॉ.सुभाष लांडे यांनी केले.


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 'संविधान बचाव, देश बचाव, भाजप हटाव' या राष्ट्रीय जनजागरण मोहिमेचा प्रारंभ प्रोफेसर कॉलनी चौकात झाला. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान सभेचे ॲड.कॉ.बन्सी सातपुते होते. कॉ.बाबा आरगडे, कॉ.शंकरराव न्यालपेल्ली, प्रा.डॉ.मेहबूब सय्यद, कॉ.बहिरनाथ वाकळे, आर्कि. अर्शद शेख, संजय खामकर, संध्या मेढे आदी यावेळी उपस्थित होते..

Loading...
ॲड. लांडे पुढे म्हणाले की, राज्यात गेल्या ३० वर्षांपासून शासकीय नोकर भरती बंद आहे. अशा परिस्थितीत भाजप सरकारने सर्वच क्षेत्रात ठेकेदारी पद्धत आणली. त्यामुळे तरुणांच्या हातातील नोकऱ्या गेल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे १२५ माणसांना आपले प्राण गमवावे लागले. जी.एस.टी. मुळे छोटे उद्योग धंदे बंद झाले. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, स्रियांवरील अत्याचारात वाढ झाली, जातीधर्माचे राजकारण करणाऱ्या भाजप सरकारने मराठा मोर्च्यांची टिंगल टवाळी केल्याचे ते म्हणाले..

ॲड. सातपुते म्हणाले की, भाकपच्या १५ दिवसाच्या या जनजागरण मोहिमेद्वारे देशभर मोदी सरकारची पोलखोल करण्याचे काम होणार आहे. मोदी सरकारच्या कारभारावर, त्यांच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणावर कोणीही खुश नाही. देशात साडे चार लाख शेतकरी आत्महत्या झाल्या तरीही अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. भाजपचे हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नाही तर धन दांडग्यांच्या हिताचे आहे त्यामुळे हे सरकार उलथून टाकले पाहिजे असे ते म्हणाले. 

यावेळी कॉ. शंकर न्यालपेल्ली, कॉ.बाबा आरगडे, प्रा. डॉ . मेहबूब सय्यद, कॉ. भैरवनाथ वाकळे यांचीही भाषणे झाली. ॲड.कॉ.सुधीर टोकेकर यांनी प्रास्ताविक केले. रामदास वागस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कॉ. विकास गेरंगे यांनी आभार मानले
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.