आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत आक्रोश मोर्चा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय जनता पार्टीच्या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नसल्यानेच आरक्षण दिले जात नाही. असा आरोप करीत आरक्षणाच्या मागणीसाठी दि.२९ ऑगस्ट रोजी भाजपा सरकार चले जाव,चा नारा देत मुंबई येथे मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. काल शहरात आयोजित पत्रकार परिषदेत हेमंत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून सरकारने आरक्षण द्यावे. भाजपा सरकारने मानसिकता दाखविल्यास धनगर समाजाला आदिवासी दाखले मिळतील. या समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आजपर्यंत २२४ आंदोलने केली आहेत. 


Loading...
'धनगड' व 'धनगर' एकच असून महाराष्ट्र सरकारने सध्या भटक्या जमातीचे (एनटी) चे आरक्षण धनगर समाजाला दिले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याचा निकाल लवकरच येण्याची अपेक्षा आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. धनगर समाजातील बांधवांनी अनुसूचित जातीचे दाखले मागण्यासाठी संबंधितांना ठोस पुरावे देवून त्याचा पाठपुरावा करून आपले हक्काचे आरक्षण मिळवावे. 

ज्या पद्धतीने 'धनगड' जातीचे दाखले काढण्यासाठी 'धनगड' जातीने पुरावे देऊन दाखले काढले, तेच पुरावे धनगर समाजाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याकडे अर्ज करताना सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्याकडून 'धनगर' आणि 'धनगड' हे एकच असल्याचे शिफारसपत्र घेऊन ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.