मराठा आरक्षणाप्रश्नी तातडीने विशेष अधिवेशनाची मागणी फेटाळली,मुख्यमंत्र्यांनी दिला नकार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे कायदेशीररित्या स्पष्ट करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी आग्रही मागणी बुधवारी पुन्हा सर्व पक्षांच्या कोल्हापूरमधील आमदारांनी तसेच खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, असे अधिवेशन बोलावल्यास त्याने कायदेशीर अडचण होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मागणी फेटाळून लावल्याचे समजते.
Loading...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलक गेली ४० दिवस दसरा चौकात ठिय्या आंदोलन करत आहेत. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 


त्या वेळी ही मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगाचा अहवाल हाती आल्यावर लगेचच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून यात सरकार चर्चा करेल. त्याआधी अधिवेशन बोलावल्यास या विषयात नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मराठा समाजाला रक्षण दिल्यानंतर राज्यातील एकंदर आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होईल. 

त्यामुळे त्याचा शेड्युल नऊमध्ये समावेश करावा लागणार. त्यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेची गरज आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्याची आचारसंहिता लागल्यास केंद्राकडून याला मान्यता मिळू शकणार नाही. त्यामुळे आताच विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून तसा पस्ताव पारीत करून केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर आचारसंहितेच्या आधी मान्यता मिळवली जाईल, अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.