सणासुदींच्या काळात लोकांच्या खरेदीवर पाणी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे रुपयाच्या किंमतीत होत असलेली घसरण येत्या सणासुदींच्या काळात लोकांच्या खरेदीवर पाणी ओतणारी ठरणार आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरल्याने टीव्ही, फ्रीज त्याचप्रमाणे अनेक साधनेही महाग होणार असून कंपन्या लवकरच त्यांच्या नव्या वाढीव किमती लागू करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


Loading...
अशा साधनांना तयार करण्यासाठी अशी काही सामग्री व सुट्टे भाग लागतात की, ते आयात करावे लागतात. त्यामुळे आयात करताना डॉलर मजबूत असल्याने आयात महाग पडते. त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्चावर त्याचा परिणाम होत असतो व झाला आहे. आयात महाग झाल्यानुळे ज्या वस्तू, ब्रॅण्ड व रिटेलर हे आपले सामान आयात करतात, त्यांचे खिसेही झपाट्याने खाली होत आहेत व त्या साऱ्याचा परिणाम प्रामुख्याने ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यावर पडत आहे. 

कच्च्या मालाची वाढती किंमत ही प्रामुख्याने टीव्ही, फ्रीज, एसी, लॅपटॉप यासारख्या वस्तूंवर होणार असून त्यामुळे त्यांच्या किमती ३ ते ५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. या वस्तूंच्या नव्या किमती साधारण ७०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान वाढतील. साधारण ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिन्यात या नव्या किमती लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


जुलैमध्ये जीएसटीच्या कमी करस्तरात टीव्ही, फ्रीज या वस्तू आणल्याने २८ ऐवजी १८ टक्के कर त्यांच्यावर लावल्याने कंपन्या व ग्राहकांनाही फायदा झाला होता. मात्र, आता या स्थितीत कंपन्यांना मिळणारा फायदा कमी झाला आहे. त्यामुळे जर डॉलरचा रुपयामधील दर ७२ रुपयांवर गेला तर कंपन्यांना आणखी किमती वाढवणे भाग पडणार आहे. त्यामुळे सणांच्या येत्या हंगामात ग्राहकांना चढ्या भावात या वस्तू खरेदी कराव्या लागण्याची शक्यता आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.