पाथर्डीत दोन गटांत झालेल्या मारामारीत बारा जखमी,उपचारादरम्यान एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारी गायरान जमिनीत अतिक्रमण करून जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला अडथळा आणण्याच्या कारणावरून कळसपिंप्री गावात दोन गटांत मंगळवारी दुपारी तुफान मारामारी झाली. यामध्ये बाराजण जखमी झाले. त्यापैकी सात जणांवर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. यातील कंस लक्ष्मण पवार (वय-६५ वर्षे) यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


Loading...
यामुळे कळसपिंप्री गावात तणावाचे वातावरण आहे. कळसपिंप्री गावात गायरान जमीन आहे. या जमिनीत काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. कृषी विभागाचे जलयुक्त शिवार योजनेचे खोल समतल चराचे काम अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबाने अडविले. गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी याबाबत २५ ऑगस्ट २०१८ रोज़ी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची भेट घेतली. 

हा जमिनीचा विषय असल्याने तुम्ही तहसीलदारांची भेट घ्या, असे रत्नपारखी यांनी सांगितले. तहसीलदार नामदेव पाटील यांची ग्रामस्थांनी सोमवारी भेट घेतली. त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र आणावे, असे सांगितले. मंगळवारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन पोलिस निरीक्षकांना देऊन पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. 

तुम्ही पुढे जा, पोलिस येतील, असे सांगितल्याने ग्रामस्थ गावाकडे गेले. तेथे कृषी विभागाचे काम सुरू होते. सरपंच, माजी सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थांवर अतिक्रमण करणाऱ्या कुंटुबाने हल्ला केला. यामध्ये सरपंच बद्रिनाथ भगवान येढे (वय-३२ वर्षे), माजी सरपंच भगवान संतराम सोनवणे (वय-५५ वर्षे), विश्वनाथ नारायण बुळे, (वय-४१ वर्षे), संदीप रावसाहेब मिसाळ (वय- २५ वर्षे) संदीप शिवाजी मिसाळ (वय- २५ वर्षे), कमलाकर गणपत गाडे ( वय-३० वर्षे) दादासाहेब बन्सी झिरपे (वय- ३२ वर्षे), ज्ञानेश्वर गोवर्धन मिसाळ (वय-२६ वर्षे) हे जखमी झाले. तसेच अतिक्रमण करणाऱ्या कुंटुबावरही ग्रामस्थांनी हल्ला केला. 

यामध्ये मैनाबाई विठ्ठल बर्डे (वय६५ वर्षे), शोभा शिवाजी बर्डे (वय-३०), बाळू अर्जुन गायकवाड (वय-३० वर्षे), कंस लक्ष्मण पवार (वय ६५ वर्षे) हे जखमी झाले आहेत. बद्रिनाथ येढे, भगवान सोनवणे, विश्वनाथ बुळे, मैनाबाई बर्डे, शोभा बर्डे, बाळू गायकवाड, कंस पवार यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नगरला पाठविले आहे. 

या वेळी दोन्ही गटांमध्ये मारामारी झाल्याने ग्रामस्थ सैरभैर पळाले. नगर येथे उपचार सुरू असताना कंस पवार यांचा बुधवारी मृत्यू झाला. कळसपिंप्री येथील अतिक्रमणाच्या प्रश्नात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही घटना टाळता आली असती. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यानेच ग्रामस्थ व अतिक्रमण करणारे कटुंब यांच्यातील तणाव वाढला. मात्र, पोलिस तेथे गेलेच नाही. मारामारी झाल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी लगेच घटनास्थळी गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.