विरोधी पक्षनेते विखे पाटील व माजी मंत्री थोरात यांच्यात राजकीय समझोता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील कॉग्रेस पक्षांतर्गत असलेले मतभेद दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांची शिष्टाई तूर्त तरी सफल ठरली आहे. 

Loading...
विखे व थोरात यांच्यातील पक्षांतर्गत वाद सर्वश्रुत आहे. विखे-थोरात यांच्यातील वाद मिटविण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. अखेर खा. अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत विखे - थोरात यांच्यात मनोमिलन झाले असल्याचा दावा केला जात आहे. विखे-थोरात राजकीय समझोता झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीत खा. चव्हाण, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आदी उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यात कॉँग्रेसला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी विखे-थोरात यांच्यातील मतभेद मिटविणे अत्यंत महत्वाचे असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर खा. चव्हाण यांनी ना. विखे व आ. थोरात यांची स्वतंत्र बैठक घेतली. 

विखे-थोरातांचे म्हणणे जाणून घेऊन खा. चव्हाण यांनी एकमेकांमधील गैरसमज दूर केला. तसेच विखे-थोरातांमधील मतभेद मिटले असल्याचा दावा त्यांनी बैठकीत केला.आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळविण्यासाठी विखे-थोरातांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने खा. चव्हाण यांनी खास पुढाकार घेत त्यांच्यातील मतभेद दूर केले आहेत. 

नगरच्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने ताकदीने लढावे अशाही सूचना करण्यात आल्या. विखे-थोरातांनीच मनपाच्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करावे अशीही मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे करण्यात आली. मनपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करण्यासंदर्भात बैठकीत खल झाला. सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत एकमत मांडले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.