नगर जिल्ह्यातील भूमिपुत्राचे केरळमध्ये बचावकार्य,वाचविले अनेकांचे प्राण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केरळमध्ये अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. या पुराचा जवळपास 13 जिल्ह्यांना तडाखा बसला. केरळमधील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी सैन्यदलातील हजारो जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मांडव्याचा (ता. नगर) भूमिपुत्र व लष्करी जवान प्रमोद जगताप हेही या बचावकार्यात सहभागी झाले होते. जगताप यांच्या टीमने सलग 15 दिवस बचावकार्य करीत अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. 


Loading...
जगताप यांच्या कार्याने मांडवेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. केरळमध्ये पावसाने हाहाकार केला. त्यामुळे नागरिकांच्या घरातदारात पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या या संकटाने तीनशेच्यावर नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पुराच्या पाण्याच्या आपत्तीत अडकलेल्यांना वाचविण्यासाठी सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची बाजी लावत नागरिकांना वाचविण्याचे काम करीत आहेत. 

त्यात नगर तालुक्यातील मांडवे येथील प्रमोद जगताप या जवानाचा समावेश होता. प्रमोद जगताप हे आसाम येथे कर्तव्यावर आहेत. मात्र, एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला आले होते. त्याचवेळी पुणे येथील सैन्यदलाच्या इंजिनिअरिंगच्या तीन तुकड्या केरळला बचावकार्यासाठी पाठविण्यात आल्या. त्यातील एका तुकडीमध्ये प्रमोद जगताप यांचा समावेश करण्यात आला. 


या टीमने तातडीने केरळात दाखल होऊन बचावकार्य केले. बचावकार्य करीत असताना अनेक अडचणींचा सामना करीत जीवाची बाजी लावत अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सकाळी सुरू झालेले बचावकार्य सायंकाळी अंधार पडेपर्यंत चालत असे, असे जगताप यांनी सांगितले. 


लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे लष्कारात भरती झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केरळच्या बचावकार्यासाठी त्यांची पुणे येथील बॉम्बे इंजिनिअरिंगच्या तुकडीत निवड झाली. पंधरा दिवस बचाव कार्य करीत जगताप व त्यांच्या सहकार्यांनी अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.