नदीत बुडालेल्या मुलांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गोदावरी नदी पात्रात बुडालेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचे मृतदेह मंगळवारी आढळून आले. या मुलांचा शोध गेल्या ३५ तासांपासून सुरू होता. मंगळवारी सकाळी ९ वा. विवेक कुमावत याचा मृतदेह तर तुषार गांगड याचा मृतदेह दुपारी साडेतीन वाजता आढळून आला. दोन्ही मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन वैजापूर येथे करून सायंकाळी उशिरा दोन्ही मुलांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
Loading...

बापतरा येथील विवेक कालीचरण कुमावत (वय १४), तुषार सचिन गांगड (वय १४) हे दोघे सोमवारी सकाळी बापतरा येथील घाटावर आंघोळीसाठी गेले होते. दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघे पाण्यात बुडाले. दोघे मुले नदीत बुडाल्याचे गावात समजताच ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेऊन मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली. अग्नीशामक दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने सोमवारी सकाळी ९ पासून शोधकामाला सुरुवात केली. सोमवारी रात्रीपर्यंत शोधमोहिम सुरू होती.


मंगळवारी सकाळी ९ वाजता नाऊर येथील मच्छिंद्र गहिरे हे मासेमारीसाठी गेले असताना त्यांना विवेक कुमावत याचा मृतदेह आढळून आला. गहिरेंनी कुमावतचा मृतदेह सापडल्याची बातमी बापतरा ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थ व पथक नाऊर येथे पोहोचले. त्यानंतर विवेकचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वैजापूरला पाठवण्यात आला. त्यानंतर तुषार गांगडचा शोध घेण्यासाठी पथकाने बाभुळगाव येथे शोध मोहिम राबवली. सतिष इंदरके यांच्या शेताजवळ गांगड याचा मृतदेह सापडला. 


विवेक कुमावत, तुषार गांगड हे दोघे जीवलग मित्र होते. त्यांच्या निधनामुळे दोन्ही कुटुंबासह बापतरा गावावर शोककळा पसरली आहे. विवेक व तुषारवर शोताकूल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. कुमावत व गांगड कुटुंबातील मुलांचे नदीत वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचे सावट असून आई, वडील, बहिण, भाऊ, नातेवाईक ग्रामस्थांनी हंबरडा फोडून अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.