थकित वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदे समोर मारल्या बोंबा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सात ते आठ महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली असता ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. डफ व ताश्याच्या निनादात या प्रशासकीय कामाचा निषेध व्यक्त करुन, दि.10 सप्टेंबर पुर्वी थकित वेतन मिळण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा दि.11 सप्टेंबर नंतर केंव्हाही बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

मोर्चाची सुरुवात बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयापासून झाली. या मोर्चात जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, कार्याध्यक्ष सुभाष आल्हाट, कॉ.अंबादास दौंड, मारुती सावंत, प्रशांत उपाध्ये, संजय डमाळ, संतोष लहासे, विष्णू वाघ, प्रभाकर शेंडगे, संजय शेलार, सतिश पवार, संजय कांबळे, सुनिल शिंदे, सुरेश कोकाटे, राहुल पोळ, धनराज गजरमल, उत्तम करारे, दादाभाऊ चौधरी, गोरख शिर्के, सुरज गोरे, राजेंद्र कोरडे, अलका भिंगारदिवे, लोकेश मोरे, अंबीर तांबोळी, रामदास साळवे, श्याम पटारे, संजय शेलार आदिंसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला असता ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी जोरदार निदर्शने करीत बोंबा मारल्या.
Loading...
ग्रामविकास मंत्रालयाने ग्रामपंचायत दि.18 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत (आकृतीबंध) कर्मचारी यांची ऑनलाईन माहिती भरणे व न भरल्यास पंचायत मुख्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे वेतन अदा न करण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र दिलेल्या तारखे पर्यंत अद्यापि जिल्ह्यातील काही तालुक्यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची ऑनलाईन माहिती भरलेली नाही. यामुळे सात ते आठ महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन थकित आहे. सदर कर्मचारी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारची वेळ ओढवली आहे. या परिस्थितीला तालुका पंचायत स्तरावरील अधिकारी, ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

संबंधीत अधिकार्‍यांनी जबाबदारीने काम न केल्यामुळे ही परिस्थिती ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर ओढवली आहे. वास्तविक पाहता अशा अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतू हे झाले नाही. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन दि.5 सप्टेंबर पर्यंन्त जिल्ह्यातील ग्रामसेवक कर्मचार्‍यांची ऑनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, दि.10 सप्टेंबर पर्यंन्त सर्व कर्मचार्‍यांचे थकित वेतन अदा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.