...तर भविष्यात केरळसारखे भयावह संकट महाराष्ट्रावरही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या सुमारे शंभर वर्षांतील महाभयंकर अतिवृष्टीने केरळ राज्यात सध्या हाहाकार माजवला आहे. साधारणत: आठवडाभर झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने संपूर्ण राज्यात प्रचंड उत्पात घडवला आहे. संपूर्ण देश आज केरळमधील या नैसर्गिक आपत्तीची दृश्ये पाहून हेलावून गेला आहे. 


Loading...
मात्र, केरळमधील भीषण संकटामागे निसर्गाचा प्रकोप जरी असला तरी तो होण्यासाठी मानवाची प्रचंड लालसा हेही महत्त्वाचे कारण आहे. निसर्गाची वारेमाप लूट करण्याच्या मानवी लालसेला आवर घातला नाही तर भविष्यात महाराष्ट्रावरही असे भीषण संकट ओढवू शकते, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

 महाराष्ट्रावरही ओढवू शकते राक्षसी वेगाने होत असलेले शहरीकरण, त्या अट्टहासामुळे होणारी बेसुमार जंगलतोड, अधिकाधिक पैसा कमावण्याच्या लालसेपोटी विकासकांकडून केले जाणारे अनिर्बंध खोदकाम आणि धरणांच्या देखभालीकडे स्थानिक प्रशासनाकडून होणारी अक्षम्य डोळेझाक आदी कारणांमुळे महाराष्ट्रावरही भविष्यात अशी भीषण परिस्थिती ओढवू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


महाराष्ट्रात छोटी-मोठी मिळून एकूण ३ हजार २६४ धरणे आहेत. या धरणांची देखभाल योग्यरीत्या होत नाही. धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. पूर नियंत्रण रेषेचेही भान बिल्डर आणि विकासक ठेवत नाहीत. या पूर नियंत्रण रेषेच्या आत जर बांधकामे झाली, तर त्यामुळे भविष्यात जर अतिवृष्टी झाली तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकेल.


मुंबई, ठाणे आणि नांदेड यांसारख्या वेगाने बांधकामे होत असलेल्या शहरांना हा धोका अधिक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.या ३ हजार २६४ धरणांपैकी एकट्या कोयना धरणाचा अपवाद वगळल्यास अन्य कोणत्याही धरणाला 'कॅरी ओव्हर'ची सुविधा नाही. धरण पूर्ण भरल्यानंतरही जर पाऊस पडत असेल तर धरणातील अतिरिक्त पाणीसाठा वळता करण्याची व्यवस्था म्हणजेच 'कॅरी ओव्हर फॅसिलिटी' होय. अशी सुविधा फक्त कोयना धरणाला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.