कपाळावर आठ्या असलेल्यांना हृदयविकाराचा जास्त धोका!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कपाळावर आठ्या असलेल्या व्यक्तींचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे एका ताज्या संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे कपाळावर आठ्या असलेल्या व्यक्तींनी ह्रदयाची तपासणी करून घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, असा सल्ला आता दिला जात आहे.


Loading...
एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्याच्या कपाळावरील आठ्या सहजपणे दिसतात. त्यामुळे आठ्यांचा हृदयविकाराशी सहसंबंध तपासण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे फ्रान्समधील वैद्यकीय विद्यापीठातील सहायक प्राध्यापक योलांडे इस्क्वीरोल म्हणाले. 

यादरम्यान त्यांनी ३२०० जणांचा २० वर्षांसाठी अभ्यास केला. कपाळावरील आठ्यांनुसार त्यांचे शून्य, एक, दोन, तीन असे वर्गीकरण करण्यात आले. कपाळावर आठ्या नसलेल्यांना शून्य या गटात तर आठ्यांच्या प्रमाणानुसार एक, दोन, तीन या गटात टाकण्यात आले. 


२० वर्षांच्या कालावधीत यापैकी २३३ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. यापैकी हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांमध्ये दोन व तीन गटातील लोकांची संख्या अधिक होती. यावरून कपाळावर थोड्या प्रमाणात आठ्या असलेल्यांना (एक गटातील) आठ्या नसलेल्यांपेक्षा हृदयविकाराचा धोका थोडा जास्त असतो. तर कपाळावर जास्त आठ्या असलेल्यांना (तीन गटातील) आठ्या नसलेल्यांपेक्षा हृदयविकाराचा धोका दहापट जास्त असतो.


असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. त्यामुळे कपाळावर आठ्या असलेल्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, नियमित वैद्यकीय तपासणी करावी, व्यायाम करावा, तसेच चांगला आहार घ्यावा, असा सल्ला योलांडे यांनी दिला. कपाळावर जितक्या जास्त आठ्या तितका हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचेही ते म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.