आरक्षणासाठी पदाचा त्याग करणाऱ्या गडाख ठरल्या एकमेव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी आपल्या पदाचा त्याग करणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख राज्यात एकमेव ठरल्या आहेत. राजकारणासाठी राजकीय हितसंबंध जपण्याला महत्व देऊन आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यातील लोकप्रतिनिधींना भविष्यात समाजाच्या रोषाचा सामना करावा लागण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
Loading...

सुनीता गडाख यांनी नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला असल्याने २८ ऑगस्ट रोजी नवीन सभापतीची निवड होणार आहे. याबाबत नेवासा तालुक्यातील जनतेत उत्सुकता आहे. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणासंदर्भातील आंदोलनांची तीव्रता वाढल्यानंतर राजकारण्यांप्रती जनक्षोभ वाढत असल्याचे हेरून व्होट बँक हातातून निसटण्याच्या धास्तीने राज्याच्या विविध भागांतील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे जाहीर केले होते. 

समाजासाठी या लोकांनी एवढी उदारता दाखविल्याने सर्वच थरांतून त्यांचे कौतुक झाले, तर या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र आगपाखड करण्यात आली होती; मात्र आंदोलनाची धग कमी झाल्यानंतर अशा प्रकारे आरक्षणासाठी आग्रही भुमिका घेऊन राजीनामे दिल्याचे जाहीर केलेल्यांपैकी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख वगळता कोणाचाही राजीनामा प्रत्यक्षात उतरलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

गडाख यांनी केवळ सभापतीपदाचाच नव्हे, तर पंचायत समितीच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे. सभापतीपद व सोनई गणाची जागा रिक्त झाली आहे. राज्यभरातील मराठा, धनगर, मुस्लीम समाजातील लोकांनी गडाख यांना संपर्क साधून समाधान व्यक्त केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.