भंडारदरा परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे पंचनामे करुन त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी केली आहे.

Loading...
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यावर्षी पाऊस उशिरा दाखल झाला होता; पंरतु एकदा सुरु झाल्यानंतर त्याने थांबण्याचे नावच घेतले नाही. आत्तापर्यंत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात एकट्या घाटघरमध्ये १३२५ इंच पावसाची नोंद झाली असून धरणामध्ये तब्बल १६ हजार ५९४ दलघफू आजतागायत नवीन पाण्याची आवक झाली आहे. त्यातच भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आदिवासी बांधवांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून भातशेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. 

या भातशेतीचे प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. यावर्षी पावसाने सरासरीचे अनेक विक्रम आत्ताच मोडीत काढले असून भंडारदरा पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त सगळा अहमदनगर जिल्हा अजूनही कोरडाठाक असून २०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस त्या परिसरात पडलेला नाही. रतनवाडी, साम्रद, घाटघर, मुतखेल, कोलटेंभे आदी गावांसह भंडारदरा परिसरात कित्येक आदिवासी शेतकऱ्यांची भाताची लागवडच मुळापासून सडून गेली असल्याने त्यांना आत्ताच भविष्याची चिंता जाणवू लागली आहे. 

कितीतरी शेतामध्ये पावसामुळे शेवाळ तयार झाले आहे. काही बांधवांचे भातशेतीचे बांधच वाहून गेले आहे. निसर्गाने तयार केले हे संकट आदिवासी बांधवांवर बितले असून शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्यासह शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, बाबुराव अस्वले यांनी केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.