महिलेने रडण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला, चक्क बिबट्यावर केला दगडांनी हल्ला!!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील नरसाळी येथील एका महिलेने चक्क बिबट्यावर दगडांनी हल्ला करून हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

नरसाळी येथील शेतकरी महिला मीना मधुकर राजुळे (वय ५३) या शेताच्या बांधावर गवत घेत होत्या. यावेळी त्यांच्याकडे बिबट्या चालून येत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून त्यांनी शेजारी असलेल्या दगडांचा मारा बिबट्यावर केला. तरीही बिबट्या मीना राजुळे यांच्या दिशेने येतच होता. 


Loading...
जवळ कुणीही नसल्याने बिबट्याशी प्रतिकार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुमारे ६० फुटांवर बिबट्या आल्यानंतर मीना राजुळे यांनी हातातील खुरपे बिबट्यावर उगारले. 

यानंतर बिबट्याही थोडा थबकला. मीना बिबट्याच्या दिशेने खुरपे घेऊन धावल्या. यानंतर बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर मीना राजुळे यांनी शेताच्या बांधावरचे गवत खुरपून गवताचे गाठोडे डोक्यावर घेऊन घर गाठले.

नरसाळी परिसरात महिन्यापासून अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे शेतमजूरही शेतात जायला घाबरतात. वनखात्याकडे कुणीही तक्रार केलेली नाही, त्यामुळे अजून परिसरात पिंजरा लावलेला नाही. अनेकदा बिबट्या पाहिल्याची चर्चा होते. 


अनेक जण बिबट्याच्या धाकाने एकटे शेतात जात नाहीत. रविवारी मला पहिल्यांदाच बिबट्या दिसला, मात्र रडण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला. बिबट्यावर खुरपे घेऊन धावल्याने त्याला उसात पळून जावे लागले.-मीना राजुळे, शेतकरी.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.