....रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल पण निळवंडे कालव्यांची कामे होवू देणार नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निळवंडे धरणाचे अकोले तालुक्यातून जाणारे मुख्य कालव्यांची कामे शेतकऱ्यांनी सुरू करून द्यावीत. दुसरीकडे बंदिस्त कालव्यांचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी मिळवून आणून देवू पण त्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्यास सरकार कालव्यांची कामे सुरु करेल, असे खा.सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे त्यांना भेटायला आलेल्या कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल पण कालव्यांची कामे होवू देणार नाही. कालवे भूमिगत पाईपलाईनद्वारेच झाले पाहिजे. या भूमिकेवर शेतकरी आजही ठाम होते. 


Loading...
शासकीय विश्रामगृह अकोले येथे खा.लोखंडे यांची प्रवराखोऱ्यातील कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी भेट घेतली. तेव्हा खा.लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. निळवंडे धरणाचे मुख्य कालवे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जातात त्या कालवाग्रस्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी अकोले येथे भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी खा.लोखंडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमारच केला. 

निळवंड्याचे कालवे पारंपारिक पद्धतीने नेल्यास अकोल्यातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. प्रवरा खोऱ्यातील शेतकरी हा भूमिहीन होतो आहे. कालव्यांसाठी सरकारने जेव्हा जमिनी संपादित केल्या त्या अत्यल्प दराने त्यांना मोबदला दिला. निळवंडेचे आमच्या शेतातून जाणारे पाणी हे आता आमच्यासाठी विष असेल. कुठल्याही परिस्थितीत मुख्य कालवे ओपन न जाता ते भूमिगत पाईपलाईनद्वारेच न्यावे; अन्यथा ही कामे आम्ही सुरू होवू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत कालव्याची कामे करता येणार नाही. शेतकऱ्यांचे फुललेले संसार मोडून कालवे जाणार असतील तर काय उपयोग? असा सवालही शेतकऱ्यांनी खा.लोखंडे यांना यावेळी केला. 


शेतकरी यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते ही चांगलेच आक्रमक झाले होते. . यानंतर खा.लोखंडे शेवटी म्हणाले, पारंपारिक ओपन कालवे नेले तर ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून बंदिस्त कालव्यांसाठीचा हा खर्च १२०० कोटी आहे. अकोले तालुक्याने मला न बघताही सर्वाधिक मते दिली. ७ कोटींचे निळवंडे धरण २३०० कोटींवर गेले. मी अकोले तालुक्याच्या विरोधात नाही. सर्वांना न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे.


लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहिजे. अकोले तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यांसाठी संपादित केल्या त्यांना पूर्वी मिळालेली भरपाई त्यापेक्षा अधिक भरपाई आपण मिळवून देवू. जे शेतकरी भूमिहीन होत आहे त्यांना पर्यायी जमिनी मिळवून देवू. राज्यासह केंद्राकडून जी म्हणून मदत करता येईल. ती मिळवून देवू. ओपन कालवे गेल्यास त्यातून होणाऱ्या पाण्याच्या पाझराचा लाभही होईल. पाणी मोटारीद्वारे उपसताही येईल. 


बंदिस्त कालव्यांसाठी शासन पातळीवर मुंबईत लोकप्रतिनिधी, शेतकरी व आम्ही अशी संयुक्त बैठकही घेऊ, तसा प्रस्तावही केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवू. त्याचा आपण पापठपुरावा करू. तालुक्यातील माजीमंत्री मधुकरराव पिचड, आ.वैभवराव पिचड यांनाही बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवू, पण ही कालव्यांची कामे सुरू करून द्या. बंदिस्त पाईपलाईनसाठी खोदावे लागणार आहेच मग कालवे खोदू द्या. तोपर्यंत प्रस्ताव मंजूर होईल. मग त्यात पाईपही टाकता येतील पण शेतकऱ्यांनी विरोध केला तर सरकार कालव्यांची कामे सुरू करेल, असेही खा.लोखंडे म्हणाले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.