संदीप वराळ हत्या ; प्रवीण रसाळ व त्याचा भाऊ माउलीचा जामीन फेटाळला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ हत्येतील मुख्य आरोपी प्रवीण आनंदा रसाळ व त्याचा भाऊ माउली आनंदा रसाळ याचा जामीनअर्ज नाशिक येथील मोक्का न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती अॅड. संकेत ठाणगे यांनी दिली. 


Loading...
२०१४ मध्ये संदीप वराळ यांचे ज्येष्ठ सहकारी सुनील रघुनाथ पवार यांच्यावर प्रवीण रसाळ व त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी रसाळ याला वैद्यकीय उपचारांसाठी नगर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. हा जामीन नगर न्यायालयाने रद्द केला असल्याची माहिती ठाणगे यांनी दिली.

 संदीप वराळ यांची २१ जानेवारी २०१७ रोजी एसटी बसस्थानक परिसरातील चौकात रसाळ व त्याच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली. रसाळ व त्याच्या साथीदारांना मोक्का लावण्यात आला आहे. त्याची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू आहे. जामीन मिळवण्यासाठी रसाळ व त्याचे साथीदार प्रयत्नशील आहेत. 


नाशिकच्या न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडल्याने रसाळ व त्याच्या भावाचा जामीनअर्ज फेटाळला गेला. न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी दोन्ही आरोपींचे जामीनअर्ज नामंजूर केले. त्याबद्दल वराळ समर्थकांनी समाधान व्यक्त केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.