ग्रामपंचायत सदस्यास धमकी दिल्याप्रकरणी संदीप कर्डिलेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमच्या कामाला आडवा येऊ नको, तुम्ही मेंबर आहात म्हणून प्रेमाणे सांगतो, आमच्या नादी लागलात तर हातपाय तोडतो, अशी धमकी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले यांनी नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांना दिली. या प्रकरणी झोडगे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात संदीप कर्डिलेंसह सहा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Loading...
याबाबत झोडगे यांनी निवेदनात म्हटले आहे, की मी बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलो असताना नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत खोदकाम सुरू असल्याचे दिसले. त्याबाबत संबंधित लोकांकडे चौकशी केली असता, ते काम रिलायन्सची केबल टाकण्याबाबतचे असल्याचे समजले. 

ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी काम करणाऱ्या लोकांकडे संबंधित कामाच्या परवानगीचे पत्र मागीतले त्यावर तुषार मोरे यांनी हे काम कर्डिले साहेबांचे आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, असे सांगितले. त्यानंतर मोबाईलवरून संबंधित व्यक्तीने माझ्याशी चर्चा केली. 

नंतर याच क्रमाकांच्या मोबाईलवरून आमदार कर्डिलेंचे पुतणे संदीप कर्डिले यांनी फोन करून हे काम माझे आहे, माझ्या कामात आडवा येऊ नको, तुम्ही मेंबर आहात म्हणून प्रेमाणे सांगतो व मला पुन्हा विचारणा करू नका, असे म्हणून फोन कट केला. 

त्यानंतर खोदकाम सुरूच ठेवले. याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनी संबंधित ठिकाणी येऊन संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी वेळकाढूपणा करून सरपंचाचा आदेश आल्याशिवाय मी तक्रार करू शकत नाही, असे सांगितले. 

दरम्यान याचा राग आल्याने कर्डिले व इतर पाच ते सहा जणांनी येऊन झोडगे यांना शिवीगाळ केली. त्यातील एक जण फोन करून इतर सहकाऱ्यांना बोलवित होता आणि म्हणाला, की जल्दी इधर आओ, एकजण का कांड करना है, त्यामुळे मी तेथून पळ काढल्याचे झोडगे यांनी म्हटले. 

याबाबत झोडगे यांच्या फिर्यादीवरून संदीप कर्डिले, वाघ (पूर्ण नाव माहीत नाही), तुषार मोरे, संदीप कर्डिलेंचा चालक (नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.