तिसर्‍या फिरोदीया-शिवाजीयन्स् आंतर-शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  तिसर्‍या फिरोदीया-शिवाजीयन्स् आंतर-शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अहमदनगर महाविद्यालय मैदानावर होणार आहे. 

ही स्पर्धा अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) यांच्या मान्यतेखाली होणार असून स्पर्धेचे आयोजन मॅक्सीमस स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी आणि शिवाजीयन्स् स्पोर्टस् क्लब, पुणे आणि अहमदनगर यांच्यावतीने केले जात आहे. शांतीकुमारजी फिरोदीया मेमोरीयल फाऊंडेशनचा हा एक उपक्रम आहे.

Loading...

मॅक्सीमस स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीचे नरेंद्र फिरोदीया, मुख्य ट्रस्टी म्हणाले की, जिल्ह्यातील मुलांना आपले गुणकौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेव्दारे मिळणार असून याचा आम्हाला आनंद आहे. ही स्पर्धा १२, १४ आणि १६ वर्ष वयोगटासाठी होणार असून यामध्ये मुलांचा समावेश आहे. मुलींसाठी वेगळा गट तयार करण्यात आला असून त्यांच्याही स्पर्धा होणार आहेत.

शिवाजीयन्स् स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर म्हणाले की, विविध वयोगटातील मुलांच्या प्रशिक्षणावर भर देण्यासाठीही या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. वेगवेगळ्या वयोगटातील २४ मुलांची निवड करून त्यांना शिवाजीयन्स्मध्ये वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पुण्यातील डीएसके शिवाजीयन्स् आंतरराष्ट्रीय अ‍ॅकॅडमीमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षणाचाही समावेश आहे.

स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना फिरती ढाल आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या बरोबरच वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. गतवर्षी अनुप रमेश भगत या दहावीच्या विद्यार्थ्यांचा या प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. अनुपची निवड फिरोदीया शिवाजीयन्स् प्रशिक्षण शिबीरातून करण्यात आली होती. 


अनुपला पुण्यातील डीएसके शिवाजीयन्स् आंतरराष्ट्रीय अ‍ॅकॅडमीमध्येही प्रशिक्षण देण्यात आले होते. या धर्तीवर अजुनही अनेक खेळाडू या प्रशिक्षणा मार्फत तयार होतील. यासाठी नरेंद्र फिरोदीया यांचे मनापासून आभार. त्यांच्या पुढाकारामुळेच सर्वच स्तरातील खेळाडूंना अशी संधी प्राप्त होऊ शकणार आहे, असे वालव्हेकर यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.