...तर राहुरीचा अागामी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मराठा, धनगर आरक्षणासाठी समाजाला झुलवत ठेवणे, खोटी कर्जमाफी, पीकविमा व बोंडअळीच्या नुकसान भरपाईत चालढकल, शेतमालाला मातीमोल भाव हे भाजप सरकारचे अपयश लोकांपर्यंत नेल्यास राहुरीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केला. 


Loading...
शाहू मंगल कार्यालयात झालेल्या बूथ कमेटी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कोते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे होते. देशात रोजगार उपलब्ध करून देण्याची भाजप सरकारची घोषणा हवेत विरल्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे. 

तथापि, लाट येईल या भरवशावर बसू नका, असा सल्ला कोते यांनी दिला. नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, तात्त्विक मतभेद विसरून शिवाजी गाडे व आपण एकत्र आलो आहे. मागील विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली.मात्र, आपण सेनेला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राष्ट्रवादीत आल्याचे तनपुरे यांनी जाहीर केले. 


वांबोरी गटाकडे आमदार करण्याची ताकद आहे. मागील निवडणुकीत आपला पराभव हा फुटीमुळे झाला. या भागातील एका नेत्याला पॅकेजचा आकडा जाहीर करावयास हवा होता, असे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट तनपुरे यांनी या मेळाव्यात केला. 


आमदार म्हणून संधी मिळाली, तर वांबोरी गटामागे मोठी ताकद उभी करू, असे ते म्हणाले. गेल्या दोन टर्ममध्ये राहुरीतील कायदा व सुव्यवस्था गंभीर झाली आहे. अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाही. एकट्या राहुरी शहरात २ गोण्या भरून कट्टे सापडतील, असे तनपुरे यांनी सांगितले. 


आमदार कर्डिले यांना राहुरीत एकही साठवण बंधारा बांधता आला नाही. मुळा धरणाचे जायकवाडीला जाणारे पाणी सत्ता येताच रोखले जाईल हे त्यांचे आश्वासन फोल ठरले. 


दोन वर्षांत निळवंडे धरणाचे पाणी राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात आणले जाईल; अन्यथा मला दगडाने मारा असे सांगत लाभक्षेत्रातील जनतेला आजवर भुलवले गेले. निळवंडेचे पाणी न आणणारे प्रचाराला आल्यास त्यांच्या स्वागताला दगड तयार ठेवा, असे तनपुरे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.