लोकप्रतिनिधींचे शेवगावच्या पश्चिम भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या ४ वर्षांपासून शेवगावच्या पश्चिम भागातील वीज, रस्ते, पाणी यासह विविध प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अाहे. पाटपाणी, श्रावण बाळ योजना, घरकुल, तसेच पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिल मडके यांनी दिला. 

Loading...
पत्रकात म्हटले आहे, शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शहर टाकळी, भावीनिमगाव, दहिगाव-ने, मठाचीवाडी, बक्तरपूर, भायगाव, भातकुडगाव, गुंफा, देवटाकळी परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागात कुठेही विकासकाम चालू दिसत नाही. गेल्या चार वर्षांपासून मुळा धरणाच्या टेलच्या भागावर अन्याय होत आहे. संघर्ष करूनच पाटपाणी मिळवावे लागते. 

मुळा धरणाच्या भरवशावर शेती करणे अवघड झाले आहे. पाण्यावर हक्क असतानाही वंचित राहावे लागते. मुळाचे आवर्तन टेल टू हेड देण्याचा नियम असताना प्रशासन मनमानी कारभार करत अाहे. टेलच्या भागावर अन्याय होत असताना लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. श्रावणबाळ योजनेचा पूर्ण बट्याबोळ झाला आहे. चालू लाभार्थ्यांना वगळले आहे. नवीन लाभार्थ्यांचे प्रकरण मंजुरीसाठी गेल्या चार वर्षांपासून बैठक झाली नसल्याने प्रकरणे धुळखात पडून आहेत. 

घरकुल योजनेचा मोठा डांगोरा पिटला जात आहे, प्रत्यक्षात मात्र गरजू, बेघर लाभधारकांना घर दिले जात नाही. गेल्या तीन वर्षांपासून शहर टाकळी पाणी पुरवठा योजना बंद आहे. ती चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळे २८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दुष्काळ निधीपासून हा परिसर वंचित आहे. 

बोंडआळीचे अनुदानही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. लोकप्रतिनिधीचे या भागाकडे लक्ष नसल्यामुळे वीज, रस्ते, पाणी, घरकुल असे विविध प्रश्न भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधीने या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करून तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मडके यांनी दिला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.