भाजपाकडून मनपा निवडणुकीची चाचपणी गांधी-आगरकर गटांचे शक्तिप्रदर्शन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाने मुंबईत नगरच्या भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि.२१) बोलावली होती. या बैठकीत मनपा निवडणुकीची चाचपणी करण्यात आली असून, खा. गांधी, ॲड. आगरकर गटाला या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीसाठी दोन्ही गटांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 


Loading...
ही निवडणूक स्वबळावर की युतीकरून लढवायची, यावर बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे समजते. शहर भाजपांतर्गत गटबाजी संपवून गांधी-आगरकर गटांचे मनोमिलन करण्याचा प्रदेश पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असून त्या दृष्टीने संघटनमंत्री व पालकमंत्री यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून हाती आली आहे.

अहमदनगर मनपाची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी चाचपणी करण्याच्या दृष्टीने प्रदेश भाजपाने मंगळवारी मुंबईत नगरच्या शहर भाजप पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बोलावली होती. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, संघटनमंत्री किशोर काळकर, पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. 


या बैठकीसाठी नगर भाजपाचे नगरसेवक, मंडलाध्यक्ष, पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीसाठी खा. दिलीप गांधी व ॲड. अभय आगरकर हेही मुंबईत दाखल झाले होते. नुकत्याच झालेल्या जळगाव, सांगली मनपा निवडणुकीत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणत भाजपाचा झेंडा फडकविला आहे. 


त्यामुळे भाजप कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरच्या मनपा निवडणुकीत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवायची, की सेनेबरोबर युती करायची, यावर निर्णय प्रदेश बैठकीत विचारमंथन करण्यात आले. नगरमध्ये भाजपाची काय परिस्थिती आहे. तसेच भाजपांतर्गत असलेले खा. गांधी, ॲड. आगरकर गटाचे वाद संपुष्ठात आणण्यासाठी प्रदेश पातळीवर पुढाकार घेण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.