नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी असलेला हा बंगला पाडण्यात यावा, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सीआरझेडमधील तरतुदींचे उल्लंघन करून रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी बांधण्यात आलेले २०२ अनधिकृत बंगले तोडण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.


Loading...
नीरव मोदी, मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागांमध्ये आहेत. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. अलिबागमधील किहीम या गावात नीरव मोदीचा बंगला आहे. तर मेहुल चोक्सीचा बंगला आवास या गावात आहे. सीआरझेडच्या तरतुदींनुसार नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

इतर बंगल्यांचे काय होणार? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा यातल्या काही बंगल्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, असे उत्तर रामदास कदम यांनी दिले. समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदेशीर बंगले बांधणाऱ्यांविरोधात १६४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ अनधिकृत बांधकामे आहेत. सिनेमा क्षेत्रातील तसेच उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील लोकांचेसुद्धा यामध्ये बंगले आहेत. नीरव मोदीचा अनधिकृत बंगलासुद्धा तेथे असून तोसुद्धा तोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.