अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीला वेग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीेसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला असून, प्रभागाच्या राखीव जागांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार (दि. २४) रोजी काढण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहीर नोटीस मंगळवारी (दि. २१) ला प्रसिद्ध करण्यात आली. तर (दि. २७) ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. यामुळे मनपा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे.


Loading...

मनपाची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१८ अथवा जानेवारी २०१९ दरम्यान होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय कामकाज जोरात सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे प्रभागांची संख्या कमी होणार असून, प्रभागातील मतदारांची संख्या सुमारे १८ ते २० हजारांपर्यंत निर्धारित करण्यात येणार आहे. 

(दि. ७) ऑगस्टला प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रभागातील राखीव जागांसाठी शुक्रवारी (दि. २४) रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, त्यासाठी सोडतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच महिलांसाठीच्या राखीव जागांची सोडत काढण्यात येणार आहे. मागील वेळेला नगरसेवकांची संख्या ६८ इतकी होती. 

त्यातील ३४ जागा महिलांसाठी राखीव होत्या. या निवडणुकीसाठी किती सदस्य संख्या असणार तसेच त्यानुसार महिला राखीव आणि आरक्षण जागा सोडत काढण्यात येणार आहे. (दि. २७) ऑगस्टला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असून (दि. २४) ऑगस्टला नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिलांसाठीच्या जागांची सोडत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

या प्रभाग रचना सोडतीनंतर हरकती व सूचना (दि. ५) सप्टेंबरपर्यंत मागविण्याची मुदत आहे. त्यानंतर या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यावर (दि. २८) सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना अधिसूचना व नकाशामध्ये आवश्यक बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना (दि. १) ऑक्टोंबरपर्यंत राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.