विधानसभेच्या तयारीला लागलेल्या चंद्रशेखर घुलेनां वाढदिवसापूर्वी स्वकीयांनीच दिला झटका !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना वाढदिवसापूर्वी स्वकीयांनीच झटका दिला आहे. शेवगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात आमदार मोनिका राजळे यांनी शिरकाव केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Loading...

शेवगाव हा घुले यांचा बालेकिल्ला. ग्रामपंचायत व नंतर स्थापन झालेल्या नगरपालिकेतही त्यांची सत्ता होती. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्‍याने कायम घुले यांची साथ केली. अर्थात घुले यांना बंडखोरी नवी नाही. पूर्वीही त्यांच्या अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली. सवता सुभा उभा केला; परंतु घुले यांच्या 16 तारखेला होणाऱ्या वाढदिवसाअगोदर त्यांच्या गटाला शहरात एवढे मोठे खिंडार पडेल, असे कुणालाही वाटले नसेल.

शेवगावच्या जनतेने नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणालाही बहुमत दिले नव्हते. अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या होत्या. अपंक्षाना सांभाळता सांभाळता स्वकीयांकडे कधी दुर्लक्ष झाले, हे घुले यांना कळलेच नाही. अगदी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक व तीन अपक्ष एकत्र सहलीला गेले. 


मतदानाच्या दिवसापर्यंत ते एकत्र राहिले; परंतु अपक्षांऐवजी राष्ट्रवादीतून निवडून आलेले सदस्य फुटतील, याची कदाचित घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनाही कल्पना नसेल. आपल्याबरोबर असलेले आपले नाहीत, याची जाणीव त्यांना शेवटपर्यंत झाली नाही.

जिल्हाध्यक्षांना गावही नीट सांभाळता येत नाही !

दुसरीकडे राष्ट्रवादीतील ही खदखद भाजपने बरोबर हेरली. त्यांना गळाला लावले. निवडणूक स्थानिक पातळीवरची असली, तरी या निमित्ताने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना आपल्या तालुक्‍याचे गावही नीट सांभाळता येत नाही, हा संदेश गेला.

मोनिका राजळे विकासकामांत सक्रीय !

राजीव राजळे यांच्या निधनानंतर बराच काळ विजनवासात राहिलेल्या मोनिका राजळे आता मात्र आपले दुःख विसरून विकासकामांत सक्रीय झाल्या आहेत. पाथर्डीमध्ये भाजपत बेकीचा सूर लागला असताना मोनिकाताईंनी त्याची उणीव शेवगावमध्ये भरून काढली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांनंतर त्यांना हा विजय मिळविता आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घुले यांच्याविरोधात प्रताप ढाकणे यांचा गट सक्रिय आहे. 

आता शेवगावच्या विकासाला चालना मिळावी !
शेवगावमध्येही अंतर्गत धूसफूस आहे. त्याचा अचूक फायदा उठवून मोनिका राजळे आपला गट मजबूत करीत आहेत. नगराध्यक्ष मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडून आल्यानंतर मोनिकाताईंची भेट घेतली. शहरविकासाच्या कामांत सत्ताधारी राज्यात व केंद्रात एकाच पक्षाची सत्ता, आमदार, खासदारही सत्ताधारी भाजपचे असल्याने आता शेवगावच्या विकासाला चालना मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.