रायसोनी पतसंस्थेतील ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांचा आक्रोश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रवरा नागरी व भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ठेवीदार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भर पाऊसात ज्येष्ठ नागरिकांनी निदर्शने करीत ठेवी व्याजासह परत मिळण्याची मागणी केली.

या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत एडके, क्षीरसागर महाराज, मुन्नवर खान, विक्रम क्षीरसागर, इरफान तांबोळी, रत्नाकर जोशी, रंजनी कुरापोटी, मंदा कोतकर, ताराबाई कुऱ्हाडकर, लक्ष्मीकांत कांगो, श्‍यामा सरोदे, अरुण भंडारे, चंद्रकांत कुलकर्णी, अलका बारस्कर, रामकृष्ण परदेशी, श्रीकांत जठार आदींसह ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading...

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचद्वारे न्याय मिळूनही प्रवरा नागरी पतसंस्था व भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था (जळगाव) यांच्याकडून ठेवीदाराची रक्कम परत मिळालेली नाही. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच मार्फत ठेवीदारांना रक्कम 9 टक्के व्याजासह ठेवी परत देण्याचे आदेश झाले आहे.

त्यानंतर ठेवीदार कृती समितीने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 (3) प्रमाणे संस्थेच्या कार्यालयाचे इमारतीचा लिलाव करून ठेवीची रक्कम 9 टक्के व्याजासहित देण्यात बाबत दरखास्त वसुली अर्ज 28 सप्टेंबर 2017 रोजी मंजूर केला आहे. मात्र, आजपर्यंत महसूल अधिनियम 1966 नुसार वसुलीची ठोस कार्यवाही झालेली नाही. राजकीय दबावामुळे सदर लिलाव प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा आरोप ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाचा आदेश असताना केवळ राजकीय दबावामुळे ठेवी परत मिळत नाही. तातडीने पतसंस्थेच्या मालमत्तेची जप्ती करुन लिलावाच्या पैशातून ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी व्याजासह परत करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.