शुक्रवारी शरद पवार नगरमध्ये, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवाराचीही चाचपणी करण्याची शक्यता !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी (दि.24) नगर जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवारांच्या दौर्‍याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. 
Loading...

यावेळी पवार नगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी जनांना कानमंत्र देण्याची शक्यता असून उमेदवाराचीही चाचपणी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांचा कृतज्ञता सोहळा व राहुरी येथे शेतकरी मेळावा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या या दौर्‍याला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्व दिले जाते.


भाजपकडून लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे झाल्यास महाराष्ट्रात डिसेंबरच्या आसपास एकत्रित निवडणूक होऊ शकते किंवा वेळेत झाल्यास मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होऊ शकते. या दोन्ही शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी जवळपास निश्‍चित झालेली आहे. जागा वाटपात जिल्ह्यातील नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर शिर्डी कॉंग्रेसकडे आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. 


मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याची मागणी कॉंग्रेसकडून होत आहे. मात्र, जिल्हा राष्ट्रवादीकडून त्यावर अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादीकडूनही लोकसभेसाठी पाच- सहा जणांची नावे चर्चेत आहेत. 


यासर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. रामनाथ वाघ यांच्या कृतज्ञता सोहळ्यासाठी दि.24 रोजी शरद पवार नगरमध्ये येत आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर पवार पक्षाचे आमदार व प्रमुख पदाधिकार्‍यांशी लोकसभेच्या जागेबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून ऍड. प्रताप ढाकणे, दादाभाऊ कळमकर,अरूण कडू यांच्यासह पाच- सहा जणांची नावे चर्चेत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.