नगर जिल्हावासियांनी दिला अजातशत्रू अटलजींच्या आठवणींना उजाळा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणजे अजातशत्रू असे व्यक्तित्व होते. राजकीय जीवनात विरोधकांशी मतभेद असूनही त्यांनी मनभेद होऊ दिले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नगर शहर आणि जिल्ह्याशीही त्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. याच आठवणींना सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.निमित्त होते भारतरत्न कै. वाजपेयीजी यांच्या श्रद्धांजली सभेचे.. येथील सहकार सभागृहात विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आणि सभागृहही हेलावले. राज्याचे जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर सुरेखा कदम, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. अरुणकाका जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार अनिल राठोड, प्रा. भानुदास बेरड, प्रा. शशीकांत गाडे, पोपटराव पवार, चंद्रशेखर कदम, अण्णासाहेब शेलार, चंद्रशेखर घुले अशी विविध पक्षातील तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होती. अध्यक्षस्थानी नानासाहेब जाधव हे होते.

Loading...
यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी नेमक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी पंतप्रधान असलेला हा नेता खऱ्या अर्थाने लोकनेता होता. अजातशत्रू आणि उत्तुंग असे हे व्यक्तिमत्व होते. विरोधकांशी मतभेद असले तरी त्यांनी मनभेद होऊ दिले नाहीत. कवी, पत्रकार, संपादक ते राष्ट्राचे तीन वेळा पंतप्रधान असा त्यांचा अलौकीक प्रवास होता असे ते म्हणाले. एक त्यागी, समर्पित आणि स्वाभिमानी जीवन ते जगले, अशी भावना प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली. अटलजींचे कार्य, कर्तृत्व, दूरदृष्टी हे गुण समाजातील प्रत्येकाने अनुकरणीय असेच होते, असे ते म्हणाले.


श्री. थोरात यांनी, कै. अटलजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने लोकशाही सुदृढ करणारे होते, असे सांगितले. लोकशाही बळकटीकरणासाठी आणि संविधानाने ठरवून दिलेल्या मूल्यांची जोपासना त्यांनी नेहमीच केली, असे त्यांनी सांगितले. हजरजबाबी, सह्रदयी, कवीमनाचे असणारे अटलजी कणखरही होते, असे ते म्हणाले.

खा. गांधी यांनी अटलजींच्या नगरभेटीच्या आठवणी जागवल्या तर खा. लोखंडे यांनी हळव्या मनाचा कणखर नेता अशा शब्दांत अटलजींना आदरांजली वाहिली. सर्वसामान्यांसाठी काम कऱणारा असा नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना आ. कर्डीले यांनी व्यक्त केली. खऱ्या अर्थाने राजकीय व सामाजिक जीवनात आदर्श असणारे अटलजी गेल्याने पितामह हरपल्याची खंत आ. जगताप यांनी व्यक्त केली तर अटलजींसारख्या नेता आपण कधीच गमावू नये, हा नेता सर्वांना हवाहवासा होता, अशी भावना आ. मुरकुटे यांनी व्यक्त केली.

अटलजींच्या जाण्याने कुटुंबातील ऋषीतुल्य व्यक्ती गमावल्याची भावना मनात असल्याचे आ. राजळे म्हणाल्या. देशभक्ती ओतप्रोत भरलेला हा नेता असामान्य असा होता, अशी भावना माजी आ. राठोड यांनी व्यक्त केली. संपूर्ण भारत जोडणारा असा हा नेता होता, अशी भावना पोपटराव पवार यांनी मांडली.अध्यक्षीय भाषणात श्री. जाधव यांनी अटलजींच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले. कार्यकर्ता अटलजी ते सर्वमान्य नेता अटलजी हा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. या श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक प्रा. बेरड यांनी केले
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.