राज्यातील दूध उत्पादकांना दुधाचा वाढीव अनुदान दर लागू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्यातील दूध उत्पादकांना वाढीव अनुदानासह प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याच्या सरकारी घोषणेची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली. दूध उत्पादकांनी दरवाढीसाठी राज्यव्यापी तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारने दुधावरील अनुदान पाच रुपये प्रतिलिटर करण्याची घोषणा केली होती.

गेल्या महिन्यात राज्यभरात दूध आंदोलन पेटले होते. त्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता; पण काही मोजके दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती.

त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. यानंतर संघांनी १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर देण्याची तयारी दर्शवली. 

पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही. पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य सरकारकडून पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. 

लोणी वगळता दूध भुकटी व अन्य दुग्धजन्य उत्पादनांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. तसेच दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेणाऱ्या दूध भुगटी उत्पादकांना भुकटी निर्यातीसाठीचे अनुदान दिले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.