जैन समाजाची समग्र माहिती लवकरच अ‍ॅपवर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ‘मिनी मारवाड’ अशी ओळख असलेल्या नगर शहरात जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी जैन ओसवाल पंचायत सभा कार्यरत आहे. जैन ओसवाल युवक संघ मागील 9 वर्षांपासून स्नेह उत्सवच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम करीत आहे. लवकरच समाजाची समग्र माहिती देणारे अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात येणार आहे. याव्दारे एका क्लिकवर समाजाबाबत सर्व माहिती उपलब्ध होईल. यासाठी सर्वांनी माहिती संकलनाच्या कामात सहकार्य करावे, असे प्रतिपादन अहमदनगर जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. 


Loading...
श्री अहमदनगर ओसवाल पंचायत सभाव्दारा जैन ओसवाल युवक संघ (जॉईज) ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही स्नेह उत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले. या उत्सवातील स्पर्धांचे पारितोषिक वितरण केशरगुलाब मंगल कार्यालय येथे नुकतेच झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फिरोदिया बोलत होते. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील 75 वर्षे पूर्ण करणार्या ज्येष्ठांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमास मर्चंटस् बँकेचे चेअरमन संजीव गांधी, जैन ओसवाल पंचायतचे प्रधानमंत्री शैलेश मुनोत, सी.ए.रवींद्र कटारिया, राजेंद्र चोपडा, आनंदराम मुनोत, अनिल पोखरणा, संजय चोपडा, अशोक (बाबूशेठ) बोरा, निलेश चोपडा, संपतलाल मुथियान, अ‍ॅड.विकी मुथा, संतोष गुगळे, अजित बोरा, अमित मुथा, कमलेश भंडारी, संतोष गांधी, मीनाताई मुनोत, जॉईजचे अध्यक्ष राजेश बोरा, सचिव भूषण भंडारी, माजी अध्यक्ष समीर बोरा, सचिन डुंगरवाल, निर्मल गांधी आदी उपस्थित होते. 


फिरोदिया पुढे म्हणाले की, स्नेह उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा, उपक्रमातून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच एक वेगळा आनंद मिळवून दिला जातो. यातूनच समाजातील एकोपा वृध्दींगत होतो, चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते. या माध्यमातून तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाची प्रचिती येते. सर्वांना एकत्रित आणतानाच उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजन युवा वर्गाने केले. 


उत्सवाचे नववे वर्ष प्लास्टिक बंदी ही थीम घेवून साजरे करण्यात आले. पुढील वर्षी या उत्सवाची दशकपूर्ती आहे. दरम्यान, वीस दिवसांच्या स्नेह उत्सवात स्लो सायकलिंग, धावणे, जलतरण, बुध्दीबळ, बॅडमिंटन, हस्ताक्षर, रांगोळी, मास्टर शेफ, किचन क्विन, छाता पेंटींग, फेस पेंटींग, बेस्ट ऑफ वेस्ट अशा स्पर्धा झाल्या. लहान मुलांसाठी रांगणे स्पर्धा सर्वात आकर्षक ठरली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सी.ए.महेश भळगट यांनी केले. सचिव भूषण भंडारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.