देवळाली प्रवरा येथील तरुणाचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दिपक देवराम सुर्यवंशी (वय ३५) या तरुणाचा काल सकाळी दि. १९ ऑगस्ट रोजी मृतदेह आढळून आल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा घातापाताचा प्रकार असल्याची शंका व्यक्त करुन राहुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत संशयीत आरोपींना पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात पोलिस पथके रवाना केली आहेत.

Loading...
दिपक हा गेल्या काही वर्षापासून देवळाली प्रवरा येथील इनाम वस्ती येथे पत्नी व मुलांसोबत मोलमजूरी करुन आपला उदरनिर्वाह करत होता. १८ ऑगस्ट रोजी त्याच्या घरी आलेल्या पाहूण्यांना सोडण्यासाठी तो सायंकाळी चार वाजता घरातून बाहेर पडला, तो परत घरी आलाच नाही. 

काल सकाळी देवळाली प्रवरा-गणेगाव रोडलगत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती कळताच श्रीरामपूर येथील डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे, राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फॉरेन्सीक लॅबचे पथक, सहा.पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस शिपाई गुलाब मोरे, गौतम लगड, गणेश फाटक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

दिपक हा काही वर्षापूर्वी एका मुकादमाकडे कामाला असताना त्याच्याकडून त्याने उचल घेतली होती. १८ ऑगस्ट रोजी तो उचलची रक्कम वसूल करण्यासाठी मयत दिपक सुर्यवंशी याला भेटला होता. त्यानंतर दिपक हा बेपत्ता झाला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती मयत दिपकच्या पत्नीने दिली आहे. 

दिपक सुर्यवंशी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या यकृतला, डोक्याला व इतर ठिकाणी एखाद्या टणक वस्तूचा जबर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे राहुरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्रिती भोजने यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.