पाथर्डीत दादापाटील राजळे महाविद्यालयातील शिपायाचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील दादापाटील राजळे महाविद्यालयात शिपाई पदावर काम करणारा बलभीम छबुराव काबंळे याचा कोणीतरी अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खुन केला आहे. मंगळवारी रात्री ही घटना कासार पिंपळगावजवळ जांभुळओढा येथे घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कासारपिपंळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात शिपाई पदावर काम करणारा बलभीम कांबळे मंगळवारी रात्री घरी गेलाच नाही. पत्नीने फोन करुन विचारले तेव्हा मी घरी येणार असल्याचे कांबळे यांने सांगितले होते. त्यानंतर रात्री त्याचा फोन बंद झाला. 

सकाळी कासारपिपंळगाव-तिसगाव रस्त्यावर जांभुळओढा येथे काबंळे याची मोटारसायकल काही लोकांनी पाहिली. पुलाशेजारी कांबळे याचा मृतदेह पडलेला होता. गावातील काही लोकांनी रामदास काबंळे यांना फोनवरुन माहिती दिली. रामदास व त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. तेथे रक्ताने माखलेल्या अवस्थेत बलभीम पडलेला होता. 

बलभीमच्या मानेवर उजव्या बाजुने धारदार शस्त्राने वार केल्याने मोठी जखम दिसत होती. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर घटनास्थळी पोहचले. बलभीम सोबत मंगळवारी रात्री कोण-कोण होते याचा तपास घेतला असता त्याच्या जवळच्या नातेवाईकांसोबत तो धाब्यावर जेवला व त्यानंतर ही घटना घडली असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. 

शेवगाव ग्रामिणचे पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांचे ठसे तज्ञपथक, श्वानपथक व फिरते वैज्ञानिक तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले. 

मयताचा भाऊ रामदास काबंळे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. बलभीम काबंळे याचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बलभीमचा खुन कोणत्या कारणासाठी झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.