कोपरगावात सराफ दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मुख्य रस्त्यावर सात ते आठ दरोडेखोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर धाडसी दरोडा टाकला. त्यांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय ३६) ठार झाले तर गणेश सुभाष घाडगे (वय ४२) जखमी झाले.जखमीवर कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी त्यास नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
Loading...

याबाबत सविस्तर असे कि, लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शेजारील छोट्या दुकानात सर्व माल हलविण्यात आला होता. यातील लाखो रुपयांच्या सोने- चांदीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. दरोडेखोरांनी दुकानात घुसल्यावर गोळीबार केला. यात शाम यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर गणेश यांच्या पोटात एक गोळी लागली व एक हाताला चाटून गेली. 

त्यांचे वडील सुभाष यांच्या डोक्याला दरोडेखोरांनी पिस्तुल लावले व सर्व माल लुटून नेला. काल कोळपेवाडीचा आठवडे बाजार होता. त्यामुळे गावात मोठी गर्दी होती. सायंकाळची वेळ असल्यामुळे दुकानदार दुकानांची आवरासावर करत होते. याच परिस्थितीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला. त्यांनी जाताना लोकांच्या दिशेने दगड फेकले. त्यामुळे लोक बाजुला झाले. हीच संधी साधत ते पळून गेले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.