शिर्डीचे खासदार फक्त आठ गावांसाठीचेच आहेत का? -डॉ.सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी लोकसभा मतदारसंघ सहा तालुक्यांचा आहे. या मतदार संघातील खासदार फक्त आठ गावांचेच आहेत का? निळवंडे धरणाचे काम बंद आहे आणि सत्काराचा मात्र धडाका सुरु आहे. केंद्रीय मंर्त्यांची आश्वासने देखील विसंगती निर्माण करीत असल्याने लोकांना अंधारात ठेवण्याचाच हा प्रकार आहे. वर कामे नाहीत, मग खाली पाणी कसे येणार हे आगोदर सांगा, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी करत खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर सडकून टिका केली. 

निळवंडेच्या संदर्भातील वस्तुस्थिती लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर मांडण्यासाठी आपण कार्यशाळा घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.. राहाता तालुक्यातील केलवड येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित समारंभात डॉ. विखे बोलत होते. 

Loading...
यावेळी नायब तहसीलदार राहुल कोताडे, सुभाषराव गमे, पी. डी. गमे, सरपंच सौ. मिना गोडगे, उपसरपंच दत्तात्रय गोसावी, माजी सरपंच बाबासाहेब गमे, तबाजी घोरपडे, नरेश राउत फौंडेशनचे सेक्रेटरी प्रा. लक्ष्मण गोर्डे, पंचायत समितीचे सदस्य काळू रजपुत, भास्करराव घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे यांनी निळवंडे संदर्भात आपले परखड मत व्यक्त करत विखे कुटूंबियांवर याबाबत चुकीचे आरोप होत असल्याचे सांगत या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले ३० वर्षात काय केले असा प्रचार ते करतात. हे आता आले, काय करणार? निळवंडे धरणाची वास्तविकता सांगण्यासाठी आपण कागदपत्रांसह सादरीकरण करणार आहोत. 

निळवंडेची वास्तविकता काय? या कामात कोण अडचणी आणतो? नेमके कोण दोषी आहेत? हे आपण स्पष्ट करणार आहोत. ज्या केंद्रीय मंर्त्यांनी अकोल्याचे शिष्टमंडळ त्यांना भेटले तेव्हा आश्वासन दिले की बंदिस्त कालवेच करु. नंतर कालवे बंदिस्त होणार नाहीत, असेही सांगितले. अशी विसंगती निर्माण करणारे आश्वासन देवून काम होईल का? 

आपण हे सर्व उघडे पाडण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक बोलवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निळवंडे धरणाच्या बाबत ना. विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानकडून ५०० कोटी रुपये मंजुर करवुन घेतले. त्यातील १२५ कोटी रुपयांचा हप्ता संस्थानने ठराव करुन तसेच मुख्यमंर्त्यांच्या मंजुरीने मिळणार होता. मात्र काहींनी त्यास विरोध केला. १२५ कोटी रुपयात कालव्याला पाणी आले असते. काही जण मध्येच आंदोलन करतात. संगमनेरला पिण्याचे पाणी निळवंडेतुन चालते. मग शिर्डीला का नको? 

भाजपाची सत्ता असलेल्या साई संस्थानने विदर्भाला १०० कोटी रुपये दिले. निळवंडेला १२५ कोटी मिळणार म्हणुन आम्ही विरोध केला नाही. निळवंडेबाबत भुसंपदानाचे पैसे घेतले, त्यांना कालव्यांना विरोध करण्याचा अधिकार नाही. निळवंडेसाठी राज्याच्या चार मुख्यमंर्त्यांनी नारळ फोडले. 

एका केंद्रीय मंर्त्यांच्या एकाच उत्तरात त्याचे काम होईल का? या लाभक्षेत्रातील लोकांना किती दिवस अंधारात ठेवणार आहात? निळवंडेचे वरचे काम करा. आपण त्यांचा सत्कार करु असे आव्हान त्यांनी खा. लोखंडे यांना दिले. केलवडसाठी १ कोटी ३५ लाख रुपये खर्चाची पाणी योजना ना. विखे पाटील यांनी मंजुर केली. येत्या २०१९ च्या निवडणुकीत ना.विखे पाटील यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार आहे,असेही ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.