पोलिसांच्या जाचास कंटाळून विषप्राशन करणाऱ्या सराफाचा अखेर मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिसांच्या नेहमीच्या जाचास कंटाळून येथील सराफ गोरख दिगंबर मुंडलिक (वय ५३) यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १७ दिवसांच्या मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काल (दि. १७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 


Loading...
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर सराफ असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील सराफ व्यवसायिकांना बंदचे आवाहन केले असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी (दि. १ ऑगस्ट) संगमनेर येथील पोलीस पथक एका इराणी आरोपीस तपासासाठी शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदही केली. त्यानंतर स्थानिक पोलीस घेऊन आरोपीने दाखविलेल्या मुंडलिक यांच्या दुकानात पोलिस पथक गेले. 

त्यांच्याकडे चोरीचे सोने घेतल्याबाबत पोलिसांनी विचारणा केली. मुंडलिक यांनी मात्र त्याचा इन्कार केला. यावरून मुंडलिक व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. संतापलेल्या मुंडलिक यांनी विषाची बाटली तोंडाला लावली. त्यानंतर मनोज चिंतामणी व अन्य एकाने त्यांना तात्काळ येथील कामगार रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 


१७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काल (दि. १७) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालविली.. घटनेनंतर सराफ बाजार बंद ठेवून व्यावसायिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित पोलिसांवर कारवाई मागणी केली होती. या प्रकरणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत असून आज (दि. १८) महाराष्ट्रातील सराफ व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.