माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्रकार, कविमनाचे साहित्यिक, अमोघ वक्ते, मुत्सद्दी नेता, प्रखर राष्ट्रवादी तरीही विरोधकांसाठी सन्मानीय-आदर्शवत असे बहुआयामी समन्वयी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. 


वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाजपाला शून्यापासून सत्तासोपानापर्यंत घेऊन जाण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या जाज्वल्य राष्ट्रभक्ताच्या निधनामुळे भाजपामधीलच नव्हे, तर देशाच्या राजकारणातीलही अटल युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

पक्षीय अभिनिवेश दूर सारून देशाच्या प्रगतीसह विश्वबंधुत्वासाठी झटणाऱ्या या अजातशत्रू-वाक्पटूची ही एक्झिट आप्तस्वकियांसह विरोधकांनाही चटका लावून गेली. बारा वेळा खासदार आणि तीनदा पंतप्रधान राहिलेल्या वाजपेयींच्या रूपाने भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने अवघा देश हळहळला.

कार्यकर्ता, खासदार ते पंतप्रधानपदापर्यंत सुमारे पाच दशकांची देदीप्यमान कारकीर्द गाजवणाऱ्या वाजपेयींनी दशकभरापूर्वीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. व्हिलचेअरशिवाय त्यांना चालणे-फिरणे शक्य नव्हते. 

स्मृतिभंशाच्या आजारासोबतच वाढत्या वयोमानामुळे अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. जून महिन्यात त्यांची तब्येत अधिकच खालावली. किडनी, मूत्राशय, छातीशी संबंधित त्रासामुळे त्यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरूच होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.