शिर्डी संस्थानने नगरपंचायत ताब्यात घेऊन शिर्डीचा विकास करावा - खासदार गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंतप्रधान घरकुल योजनेत घरकुल बांधण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीने जागा देण्यास नकार दिल्याने ही योजना शिर्डीत रखडली आहे. वास्तविक पाहता नगरपंचायतीने जागा द्यायलाच हवी. तिरुपती बालाजी देवस्थानप्रमाणेच आता शिर्डी संस्थाननेच तेथील नगरपंचायत ताब्यात घ्यावी. शिर्डी शहराचा विकास करावा, असे वक्तव्य खासदार दिलीप गांधी यांनी केले. 


Loading...
खासदार गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात दिशा समितीची सभा झाली. या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्र सरकारकडून राज्यात पंतप्रधान घरकुल योजना राबवली जात आहे. या योजनेत शिर्डी, नेवासा व शेवगाव या शहरांचा डीपीआर तयार झाला नसल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. त्यावर शिर्डीतील योजनेचा आराखडा तयार आहे. परंतु, घरकुलांसाठी जागा नाही. नगरपंचायतीने जागा देण्यास नकार दिल्याचे अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले. 

त्यावर खासदार गांधी यांनी नगरपंचायतीने उदात्त दृष्टीकोन ठेवून जागा द्यायलाच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या ठिकाणी जागा नसेल तर अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून काम सुरू करण्यास सांगितले. परंतु, येथील जागांचे भाव गगनाला भिडले असल्याने हे शक्यच नसल्याचेही समोर आले. त्यावर तिरुपती बालाजी संस्थानच्या धर्तीवर शिर्डी संस्थानने नगरपंचायत ताब्यात घेऊन शिर्डीचा विकास करावा, असे वक्तव्य गांधी यांनी केले. 


संस्थानच्या कारभाराबाबत अन्य सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. येथील कारभार सुधारण्याची इच्छा सदस्यांनी व्यक्त केली. तसेच संस्थानमध्ये नगर जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश होणे अपेक्षित असताना मुंबईच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे, असे नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी सांगितले. सामाजिक सहाय्य योजनेवरही सभेत वादळी चर्चा झाली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.