डॉ. आंबेडकर समाजमंदिराचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांनी रोखला-सचिन जाधव


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपाच्या महासभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजमंदिरासाठी धनादेश देण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सभागृहातच ठिय्या दिल्यानंतर प्रशासनाने ५ लाख ८० हजारांचा धनादेश दिला. तथापि, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार हा धनादेश स्थगित ठेवण्याचे आदेश दिल्याचा आरोप नगरसेवक सचिन जाधव यांनी केला आहे. 
Loading...

जाधव म्हणाले, मंगलगेट परिसरातील नागरिक व तेथील दलित समाजबांधवांच्या मागणीनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिराचे काम मंजूर करण्यात आले. महापौर सुरेखा कदम यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने कामही सुरू झाले. 


तथापि ६ ते ७ लाखांच्या बिलासाठी प्रशासनाकडे चार महिने पाठपुरावा केला. मात्र, जिल्हाधिकारी तथा आयुक्तांकडे यंत्रणा बोट दाखवत होती. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाठिंबा दर्शवून ठिय्या आंदोलन सुरू केले. 


समाज मंदिराचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महापौर कदम यांच्या आदेशानुसार धनादेश तत्काळ अदा करण्यात आले. महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असलेल्या महासभेने, महापौरांनी व सर्व नगसेवकांनी एकत्र येवून घेतलेल्या भूमिकेनंतर कॅफोंनी धनादेश अदा केल्यामुळे व ते काम मार्गी लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अडचण निर्माण होण्याचे कारण काय? असा सवालही जाधव यांनी केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.