धनगर समाज भाजपला खाली खेचूही शकताे,खा. महात्मेंकडून घरचा अाहेर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असले तरी आता फार विलंब होता कामा नये. भाजपला आम्ही सत्तेवर आणले तसे सत्तेवरून खेचूही शकतो, असा इशारा भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आपल्याच सरकारला दिला. नागपुरात धनगर समाजाच्या रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान ते बाेलत हाेते. 

Loading...
दरम्यान, आंदोलन करणारे खासदार महात्मे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने सोमवारी राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नागपुरात धनगर आरक्षण संघर्ष समितीचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

मोठ्या संख्येने धनगर समाज शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर आल्याने बराच वेळ वर्धा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी महात्मे म्हणाले, दर सहा महिन्यांनी अहवाल लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता आमचा संयम संपण्याच्या मार्गावर आहे. आरक्षणावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असल्याचे आम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आहे. 

हा प्रश्न आम्ही राज्यसभेतही उपस्थित केला होता. भाजप सरकार त्यावर सकारात्मक असले तरी आता विलंब होता कामा नये. आणखी विलंब झाल्यास समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील. सरकारला आम्ही सत्तेवर आणले तसे खाली खेचूही शकतो, असा इशाराही महात्मे यांनी दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.