'मी मुख्यमंत्री बोलतोय' मध्ये कोट्यावधीचा घोटाळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुंबई मी मुख्यमंत्री बोलतोय, हा कार्यक्रम ऑक्टोबर २०१७ मध्ये शेवटचा प्रसारित झाला. त्यानंतर हा कार्यक्रम झाला नसतानाही कार्यक्रमाची बिले मात्र काढण्यात आली असून न केलेल्या कामाचे महिन्याला १९ लाख ७० हजारांचे बिल एफरव्हेसेंट फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 


गेले १० महिने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. तसेच हा कार्यक्रम प्रसारित झाला नसतानादेखील आयोजन करणाऱ्या कंपनीला बिले अदा करण्यात आली आहेत. कार्यक्रम न करता या खासगी कंपनीला १० महिन्यांत २ कोटी ३६ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमासाठी शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाची यंत्रणा वापरण्यात येत होती. तरीसुद्धा आपल्या मर्जीतील कंपनीला फायदा व्हावा म्हणून भरमसाट रुपयांचे कंत्राट दिले गेले. 
Loading...

सरकारने या कंपनीबरोबर जो करार केला, त्यात कार्यक्रम झाला नाही तरी पैसे अदा करावे लागतील, अशी अट करारात मान्य केल्याचा दावा सावंत यांनी केला. एफरव्हेसेंट फिल्म प्रा. लि. या खासगी कंपनीला जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीसाठी 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाचे काम देण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या कंपनीची स्थापना हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी फक्त तीन महिने आधीच झाली होती, असे स्पष्ट करत कोणत्या निकषांवर या कंपनीची निवड करण्यात आली, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.