श्रीगोंद्यात जागेच्या वादातून रोखला एका मयत व्यक्तीचा अंत्यविधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरात जागेच्या वादातून एका मयत व्यक्तीचा दफनविधी रोखण्यात आला. श्रीगोंदा पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत संबंधितांना अंत्यविधी करून देण्याविषयी समजावले. तरीही संबंधित दफनविधी करू न देण्याच्या मुद्यावर ठाम होते. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला झाला. 


Loading...
शेवटी अंत्यविधी नातेवाईकांनी मयताच्या शेतात केला. . सविस्तर माहिती अशी, शहरात गणेश रंगनाथ येडे (वय 44 रा. होळी गल्ली) या तरुणाचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या कुटुंबाने महानुभाव पंथाची दीक्षा घेतली असल्याने मयताचे दहन न करता दफन करण्यात येणार होते. 

येथील खंडोबा मंदिर परिसरात लिंगायत समाजातील मृतांचे दफन केले जाते. त्यामुळे दफनविधीची तयारी सुरू असताना स्थानिक लोकांनी जागेच्या वादातून विरोध केला. दफनविधी ठिकाणी जमाव जमल्याने तणावाचे वातावरण तयार झाले. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्याने सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे घटनास्थळी आले. 


तहसीलदार महेंद्र माळी व मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याशी चर्चा करून कांबळे यांनी अंत्यविधी तुम्ही थांबवू शकत नसल्याचे संबंधितांना बजावले. मात्र संबंधित नागरिक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तणाव वाढत गेल्याने मृताच्या नातेवाईकांनी अखेर अंत्यविधी येडे यांच्या शेतात करण्याचा निर्णय घेतला.


 यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना हिंदूंसाठी दफनभूमी उभारण्याची मागणी केली. हीच गणेश येडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगून पुढे ते म्हणाले, गवळी, लिंगायत, महानुभाव पंथात दफन संस्कार केले जातात. 


जागेच्या वादामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून तातडीने पावले उचलण्याची सूचना पोटे यांना केली. आनंदकर मळ्यात साडेतीन एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव असल्याचे पोटे यांनी सांगितल्याने हिंदूंच्या दफनविधीसाठी पाचपुते यांच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.