गरोदर पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्णा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कानडखेड गावात सात महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर त्याने कीटकनाशक प्राशन करून स्वत:लाही संपविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 
Loading...

तालुक्यातील मौजे कानडखेड येथील कांचन लक्ष्मण चांडाळ हे शेतकरी दाम्पत्य राहते. त्यांना एक सात वर्षांची मुलगी असून कांचन ही दुसऱ्यांदा सात महिन्यांची गरोदर होती. मागील काही दिवसांपासून तिचा पती लक्ष्मण चांडाळ हा चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पोटात असलेले मूल माझं नाही ते तू गर्भपात करून घे, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यात दगड घातल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. 


त्यानंतर लक्ष्मणने स्वत:ला संपविण्यासाठी घरातील कीटकनाशक प्राशन केले. दोघेही घरात पडलेले असताना घरातून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांनी दरवाजा उघडला असता कांचन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होती तर लक्ष्मण हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.


पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या लक्ष्मणला पूर्णा येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात केले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. शनिवारी (दि.११) सकाळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले, पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ, जमादार सय्यद मोईन यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.