राफेल करार मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेला राफेल लढाऊ विमान खरेदीचा करार हा आजपर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. या कथित घोटाळ्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचाही आरोप केला. संसदेतही काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करत दोन्ही सभागृहांत आत आणि संसद परिसरात निदर्शने केली. 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली असून, शुक्रवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी राज्याचा दौरा केला. प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या नव्या इमारतीचे राहुल गांधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित भाजपा आणि प्रामुख्याने मोदींवर घणाघात केला. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारानुसार एका विमानाची किंमत सुमारे ५४० कोटी इतकी होती. Loading...
मात्र, मोदी सरकार सत्तेत आले आणि आपल्या मित्रांचे हित जपण्यासाठी त्यांनी कराराच बदलून टाकला. या सरकारने केलेल्या करारामुळे आता एका विमानासाठी देशाला १६०० कोटी रुपये मोजावे लागत आहेत. संरक्षण मंत्री, मंत्रिमंडळाला अंधारात ठेऊन मोदीजी फ्रान्सला गेले आणि त्यांनी हा करार केला. हा आजपर्यंत सर्वात मोठा संरक्षण घोटाळा आहे, असे राहुल म्हणाले. 

आधीच्या करारात सहभागी असलेल्या एचएएल या सरकारी कंपनीला डावलून ४५ हजार कोटींचे कर्ज असलेल्या आणि संरक्षण क्षेत्राचा अजिबात अनुभव नसलेल्या एका खासगी उद्योजकाला नव्या करारात सामील करून घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अनिल अंबानींच्या रिलायन्सचा उल्लेख केला.  


पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात राफेलचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. राफेल करारात घोटाळा झाला असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केली. लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी कागदी विमाने उडवली. काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरातही याविरोधात आंदोलन केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.