विवाहास नकार दिल्याने संतप्त तरुणाकडून युवतीची वडिलांसमोरच हत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विवाहास नकार दिल्याने संतप्त तरुणाने तरुणीची तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने हत्या केली. हल्ल्यात तरुणीचे वडिलही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


ही घटना नाशिक जिल्ह्यातील कसबे-सुकेणे या गावी सकाळी १०.३० वाजता घडली. घटनेनंतर तरुणाने थेट पोलिस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. विद्या चंद्रकांत ढेंगळे (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. 

विद्या सकाळी साडेदहा वाजता राहत्या घरी वडिलांसोबत घरकाम करत होती. या वेळी आरोपी सूरज दिगंबर चव्हाण (२८, रा. मौजे सुकेणे) याने घरात घुसून धारदार शस्त्राने विद्याच्या मानेवर, डोक्यावर, पाठीवर, हातावर सपासप वार केले. यामध्ये विद्याचा जागीच मृत्यू झाला. 
Loading...

विद्याला वाचविण्याचा तिचे वडील चंद्रकांत यांनी प्रयत्न केला. मात्र, आरोपी सूरजने त्यांच्या डोक्यावर व हातावर वार केल्याने ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. कसबे- सुकेणे येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. विद्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर या हल्ल्याची माहिती गावात पसरल्याने संतापजनक वातावरण तयार झाले. 

कसबे- सुकेणे पोलिस उपठाण्याचे निरीक्षक राजकुमार उपासे, नाईक रामदास घुमरे, के. बी. यादव यांनी परिस्थिती व गर्दीवर नियंत्रण मिळवत पंचनामा सुरू केला. दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी सूरज चव्हाण हा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. राजवाडा परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी झेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पुढील तपास कसबे सुकेणे व ओझर पोलिस करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.