श्रीगोंद्यात अनोळखी महिलेचा खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहराजवळील औटेवाडी तलावात आज मंगळवारी तुपे यांच्या विहिरीत विवस्त्र अवस्थेत सापडलेल्या अनोळखी स्त्री मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेचा खुन झाला असल्याचे सांगितले. सदर मयत महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह हा पाण्यावर तरंगताना पालथ्या पडलेल्या अवस्थेत आढळला. 

सदर प्रेताच्या गळ्यात व पोटाला साडीने दोन मोठे दगड बांधून हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. तसेच या महिलेचा गळा कुठल्यातरी धारदार शस्त्राने चिरलेला असून दोन्ही हाताला खोलवर जखमा झालेल्या आहेत. दरम्यान हा मृतदेह प्रचंड फुगलेला व सडलेला असल्यामुळे मृतदेहाची प्रचंड दुर्गंधी येत होती.
Loading...

या घटनेबाबत माहिती समजल्यानंतर श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व सपोनि. विठ्ठल पाटील हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह चार वाजताच पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर श्रीगोंदा वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. 

परंतु ते घटनास्थळी सायंकाळी सात वाजता आल्यामुळे मृतदेह तीन तास तसाच पडून राहिला. त्यामुळे पोलीस व सगळी यंत्रणा या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे ताटकळत त्याठिकाणी थांबले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठवला. रात्री उशिरा शेवगावचे पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. 

तसेच फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोहेकॉ रेवणनाथ दहिफळे, पोकॉ किरण जाधव, रवी जाधव, सगर यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.दरम्यान अनोळखी महिलेची प्रथम ओळख पटवून तिच्या खुनाचा तपास करून आरोपी लवकरच जेरबंद केले जातील असे पोलिस अधिकारी श्री. पोवार यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.