आदिक, पटारेंकडून राजकीय फसवणूक -माजी आ.मुरकुटे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माझा मुलगा व सुनेची उमेदवारी बाजूला ठेवून अनुराधा आदिक व दीपक पटारे यांना संधी दिली. पालकमंत्री राम शिंदे यांच्या सहकार्याने 'महाआघाडी' बनविली. आणि नगरपालिका व पंचायत समितीची सत्ता मिळविली. सत्ता मिळताच आदिक व पटारे यांनी माझी राजकीय फसवणूक केली,अशा शब्दात माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी आपल्या संतापास जाहिरपणे वाट मोकळी करुन दिली. 

Loading...
जि.प.सदस्य शरद नवले यांच्या निधीतून मालुंजा-कारेगाव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मुरकुटे बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब आवटी, पं.स. सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि.प. सदस्य शरद नवले, बबनराव मुठे, अच्युत बडाख आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुरकुटे म्हणाले, आपण गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत कोणाचीही फसवणूक केली नाही. राजकारणात वेळप्रसंगी रोष पत्करुन व राजकीय किंमत मोजून रोखठोक भूमिका घेतली. नगरपालिका निवडणुकीत माझी सून मंजूश्री मुरकुटे हिस नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा संघटनेतील कार्यकर्त्यांचा आग्रह होता. 

असे असतानाही आपण अनुराधा आदिक यांना उमेदवारी दिली. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह महाआघाडीच्या पाठबळावर अनुराधा आदिक नगराध्यक्षपदी निवडून आल्या. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागली. 

या निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचा प्रस्ताव आपण जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांना दिला. भाजपाचे हेरंब औटी, बबन मुठे, सुनील मुथा आदींसह भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाआघाडी बनविण्याचे प्रयत्न केले. 

अखेरीस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाआघाडीच्या वतीने लढविण्याचा निर्णय झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या बेलापूर गटातून किंवा निपाणी गणातून सिध्दार्थ मुरकुटेंना उमेदवारी देण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. 

तथापी, आपण बेलापूर गटातून शरद नवले व दीपक पटारे यांना निपाणीवडगाव गणातून उमेदवारी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अविनाश आदिक यांनी नगरपालिका निवडणुकीत महाआघाडीची भूमिका विसरुन महाआघाडीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे केले. 

त्यामुळे काही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत दीपक पटारे निवडून आले व सभापती झाले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद नवले व संगिता गांगुर्डे यांच्या भरवशावर पालकमंत्री राम शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. 

त्यावेळी शरद नवले यांनी ना.राधाकृष्ण विखे यांना पाठिंबा देवून माझा विश्वासघात केला. यामुळे मला पालकमंत्री शिंदे यांच्या नाराजीस तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर मी सक्रिय राजकारणापासून काही काळ जाणीवपूर्वक अलिप्त राहिलो. तथापि आता आपल्या पुढील राजकारणाची दिशा कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच ठरवणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.