मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी गडाख यांचा राजीनामा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनिता शंकरराव गडाख यांनी सभापती व पंचायत समितीच्या सदस्यापदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

गडाख म्हणाल्या, गेल्या वर्षभरात मराठा समाजाचे सुमारे ५० पेक्षा जास्त मोर्चे शांततेत झाले,परंतु राज्य शासनातर्फे हा प्रश्न न्यायालयात व मागास आयोगाकडे प्रलंबित आहे. तांत्रिक सबबी पुढे करून वेळकाढूपणा करण्यात येत आहे. कुठल्याही राज्यकर्त्यांनी यात लक्ष घातले नाही. शेवटी याचा दुर्दैवी परिणाम हे आंदोलन पुन्हा पेटते झाले. 


Loading...
त्यात हिंसाचार घडवून त्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आणि या सर्वांची परिणीती अनेक समाज बांधवांनी आत्महत्या करण्यात होत आहे. या दुर्दैवी कुटुंबावर झालेल्या आघाताला शब्द अपुरे आहेत. या सर्व कारणांनी मी गेले काही दिवस अस्वस्थ होते. या विषयावर नेते व मार्गदर्शक माजी आ. शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली.

त्यांनी मला जनतेपेक्षा कोणतेही पद मोठे नाही. प्रसंगी त्यासाठी कोणतेही पद सोडून समाजाबरोबर उभे राहिले पाहिजे, असा सल्ला दिला. त्यांच्या या भूमिकेनुसार मी आज माझ्या पंचायत समिती सभापतीपद व पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापुढेही मी पूर्ण ताकदीनिशी सर्व समाज बांधवांच्या रास्त मागण्यांसाठी त्यांच्याबरोबर लढाईत सामील असणार आहे.

शेतीच्या दुराव्यवस्थेमुळे व्यथित झालेला मराठा समाज व त्याचबरोबर मुस्लिम, धनगर समाज यांच्या आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणे शक्य आहे.

माझ्या सभापतीपदाच्या कार्यकाळात यशवंतराव गडाख यांचा आदर्श व शंकरराव गडाख यांचे मार्गदर्शन व सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य व आपल्या सर्वांचा आशीर्वाद यामुळे मी यशस्वी होऊ शकले. आपले सहकार्य व आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबाच्या पाठिशी राहतील, असा मला विश्वास आहे, असेही सुनिता गडाख यांनी म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.