पावसाच्या हुलकावणीने खरीप हंगाम धोक्‍यात : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात अकोल्याचा काही भाग वगळता बहुतांशी ठिकाणी पाऊस रुसल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. जुलै, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडा होऊनही पाऊस न पडल्याने 4 लाख हेक्‍टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. 


खरीप हंगामाच्या सुरवातीस पेरणीयुक्‍तपाऊस झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. सुरवातीच्या काळात पिकांना पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची वाढही चांगली होऊन पिके फुलाऱ्यात आली. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके आता संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

Loading...
खरीप पिके घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल असतो. रोहिणी, मृग, आर्द्रा या नक्षत्रात जिल्ह्यात पाऊस झाल्याने सुमारे 4 लाख 17 हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. पुनर्वसू नक्षत्रापासून जवळजवळ पावसाने हुलकावणी दिली. 

त्यातच महात्मा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दडी मारुन बसलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्‍यात आली असून, काळ्या आईवर संकट आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 42 टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच काळात 54 टक्के पाऊस झाला होता. आता तर पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास खरीप हंगामच वाया जाण्याची भीती कृषी तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.