नगर शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत सकाळी ८ च्या सुमारास सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत सकाळी ९ च्या सुमारास इम्पिरियल चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. 

Loading...
सकल मराठा समाजाच्या शहर बंदच्या हाकेला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. दरम्यान, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

दुचाकी रॅली, तसेच मोर्चाने येणारे सर्व मराठा आंदोलक सकाळी इम्पिरियल चौकात जमा झाले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी चौकात ठाण मांडले. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, महापौर सुरेखा कदम, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. आक्रमक झालेल्या तरुणांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे आंदोलन सुरू होते, तर दुसरीकडे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. 

व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. नगर-पुणे महामार्गावरील सर्व वाहतूक कोठी रस्त्याने वळवण्यात आली होती. इम्पिरियल चौकात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. अनेकांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. 

आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास सरकारच्या निषेधार्थ जागरण गोंधळही घालण्यात आला. 

दरम्यान, इम्पिरियल चौकात आंदोलन सुरू असतानाच काही तरुण दुचाकीवरून शहरात फिरत होते. केडगाव येथे भूषणनगर चौकात टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. आंदोलनाला इतर समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.