डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकणारे दोन दिवसात गजाआड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी येथे दि. ७ ऑगस्ट रोजी डॉ. प्रविण क्षीरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या चार चोरट्यांना नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात पकडून गजाआड केले. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.


Loading...
दि. ७ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी दीड ते तीन वाजेदरम्यान राहुरी शहरातील शेटे इस्टेट परिसरातील यशवंत कॉम्प्लेक्समधील डॉ. प्रविण राधाजी शिरसागर यांच्या फ्लॅट नंबर ४ मध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. घरातील सामानाची व कपाटाची उचकापाचक करुन कपाटातील ७ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सुमारे ३० ते ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले होते. राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या परिसरातील एका सीसी टी.व्ही. कॅमेऱ्यात सदर आरोपी दिसून आले होते. त्यानुसार शिळीमकर यांनी तपासाची चक्रे फिरवली होती.

दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हवालदार विष्णू घोडेचोर, रवींद्र कर्डिले, सचिन मिरपगार, मनोज गोसावी, राजकुमार मेठेकर, विजय ठोंबरे, योगेश गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवा काळे, संभाजी कोतकर, दीपक शिंदे, रवी सोनटक्के आदींच्या पथकाने दि. ९ ऑगस्ट रोजीच्या पहाटे तीन वाजेदरम्यान राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर फाटा येथे सापळा लावला. 


हुंदाई कंपनीची यू.पी. १६ ए.के. ३८३९ नंबरचे चारचाकी वाहन अडवून त्यातील इरफान ईशद कुरेशी (वय ३८ वर्षे), इनाम मेहमूद कुरेशी (वय ३६ वर्षे, दोघे राहणार जिल्हा हाकुड) व अस्लीम वसुरुद्दीन मरिक (वय ३५ वर्षे), ईशाद अब्दूल रहीम झोजा (वय ४५ वर्षे, दोघे राहणार जिल्हा सिकंदराबाद) या चार जणांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले तर नदिम उर्फ बंटी कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेतील सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशमधील असून त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.