भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्रिया - रुक्मिणी लक्ष्मिपती.


१९३० मध्ये गांधीजीनी दांडी मध्ये मिठाचा सत्याग्रह केला. त्याच वेळी राजाजींच्या नेतृत्वाखाली वेदारण्यम येथेही मिठाचा सत्याग्रह करणात आला. या मोर्चात केवळ दोन महिलांनी भाग घेतला होता आणि त्यांना अटकही झाली होती. त्या दोघीपैकी एक होत्या रुक्मिणी लक्ष्मिपती. रुक्मिणीचा जन्म ६ डिसेंबर १८९२ मध्ये मद्रास येथे झाला. 

त्यांचे वडील श्रीनिवासराव हे ‘विरेशलिंगम पंतूलू’ या समाजसुधारकाच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी रुक्मिणीचा बालविवाह न करता त्यांच्या शिक्षणावर भर दिला. महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख गांधी विचारांचे पालन करणाऱ्या लक्ष्मिपती यांच्याशी झाली.

नंतर रुक्मिणी आणि लक्ष्मिपती यांनी विवाह केला. विवाहानंतरही शिक्षण चालू ठेऊन त्या बी.ए पास झाल्या. १९१९ मध्ये सरलादेवी चौधरी यांनी कलकत्तात ‘भारत स्त्री महामंडळ’ या संस्थेची स्थापना केली. सरलादेवी मद्रासमध्ये आल्यानंतर रुक्मिणी लक्ष्मिपती यांच्या सहाय्याने भारत स्त्री महामंडळची मद्रासमध्ये शाखा सुरु करण्यात आली. त्याचवेळी ‘अखिल भारतीय महिला संघाची’ स्थापना करण्यात आली. या संघात अनि बेझंट, मादाम कसीस, रुक्मिणी लक्ष्मिपती सहभागी झाल्या.

बालविवाहास विरोध, दारूबंदी, देवदासीची प्रथेचे उच्छाटन या सारख्या आंदोलनात त्यांचा सहभाग असे. १९२६ मध्ये स्त्रियांना मतदानचा अधिकार मिळवा यासाठी विदेशात मोठी चळवळ उभी राहिली यानिमित्ताने पैरीस मध्ये एका सभेचे आयोजन केले होते. रुक्मिणी यांनी भारताच्या प्रतिनिधी म्हणून या सभेत भाग घेतला. तिथून पुढे त्या जपानलाही गेल्या. या दोन्ही ठिकाणी त्यांनी इंग्रजीमधून भाषणे केली.

‘भारतदेश गुलामगिरीत राहणार नाही त्याला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे’ अशा जोशपूर्ण शब्दांत त्यांनी आपली मागणी जगभरात प्रभावीपणे मांडली. १९२८ च्या सायमन परत जा चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘असहकार चळवळ, विदेशी कापडांवर बहिष्कार, कायदेभंग चळवळ’ हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र बनले होते. अटक, तुरुंगवास, सुटका पुन्हा त्याच कामाला वाहून घेणे हेच त्यांचे जीवनचित्र बनले. १९३४ मध्ये मद्रासमधील महाजन सभेच्या त्या उपाध्यक्ष झाल्या. 

१९३४ च्या कायद्यानुसार विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या रुक्मिणी या विधानसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या. १९४९ मध्ये मध्यवर्ती सरकारची स्थापना करण्यात आली. टी . प्रकाशम राज्याचे मुखमंत्री बनले या मंत्रीमंडळात रुक्मिणीनी पहिल्या महिला मंत्री म्हणून आरोग्यमंत्री पद भूषविले. स्वच्छता, समाजसेवा, आरोग्य या क्षेत्रात रुक्मिणी लक्ष्मीपती यांनी भरीव कामगिरी केली.दरम्यानच्या काळात त्यांना मधुमेहाने ग्रासले. ६ ऑगस्ट १९५१ रोजी त्यांचे देहवासन झाले.
Powered by Blogger.